Sunday, May 25, 2014

हा म्या हाय बालमजुर,
यात माझा गुन्हा काय?
मलाबी पोट हाय,
पोटाला भुख हाय,
त्यासाठी करतोया मजुरी,
दुसरा कोणता पर्यायबी नाय.

दारुपायी बा गेला.
खचुन खंगुन माय गेली.
बालपणाच्या उंबरठ्यावर,
माय बापाची सावली हरवली.

गरीबी जणु जन्मासोबत,
आंदण आली व्हती.
माय बापाच्या मरणाला,
तीच कारण व्हती.

आता हातावर पोट व्हत.
माथी आभाळाच छत व्हत.
डोळ्यात नव्हत सपान तरीबी,
डोळं कायतरी शोधत व्हत.

त्यारात्री डोळ्यात,
रातच्या भाकरीची,
चिंता साठली व्हती.
आन् मनामध्ये माय बापाची,
आठवण दाटली व्हती.

पोटासाठी मंग,
केली म्या चाकरी.
त्याच पैश्याची,
केली मंग भाकरी.
आन् त्यालाच या समाजान,
बालमजुरी म्हटली.

मला बी वाटतं की,
शाळेत जावं, लय शिकावं.
नसलेल्या त्या माय बापाच,
सपान पुरं करावं.

पण ते कव्हा जमलंच नाय.
या समाजान ते करुचं दिल नाय.
पाठीवर दप्तराचं बोझं देण्यापरिस,
डोक्यावर बालमजुरीचं ओझं हाय.

माह्यासारखं लय जणांच बालपण,
आसंच जळत हाय.
पण या समाजाला त्याचं,
कायबी घेण देण नाय.

सांग तुच आता,
ह्यो कुणाचा गुन्हा हाय?
या सार्याला मी की,
ह्यो समाज जबाबदार हाय.

आसलं जर मी तर,
हा ह्यो गुन्हा मी केला हाय.
चतकोर भाकरीपायी,
बालपण माझं जाळलं हाय.
चतकोर भाकरीपायी
बालपण माझं जाळलं हाय

प्रेममित्र

No comments:

Post a Comment