Monday, January 16, 2023

बांडगूळ वाणी

अरे तो पुरोगामिचा सूर्य ?
फितूर झाला ?
त्या मानसिकतेच्या अंधारात?
मग आता?
आता काय बडवायच?
नवीन काही आहे की नाही?
पण अर्थशून्य पाहिजे बरं?
त्या पुरोगामी सारखं.

मजा येती रे चघळ।यला.
वेळ आली की द्यायचं थुकुन.
त्यात काय एवढं?
काय?
नाय नाय लाज कशाला वाटती?
यालाच म्हणतात माणूस,
खाजव़ून खरूज करणारा.
त्यात आपली थोड़ी भर,
बांडगूळ।वाणी.
एवढचं.

- राहुल सिद्धार्थ साळवे

आजच ठरवा..

आजच ठरवा मला,जाळणार कोण आहे?
सूतक जाण्याचे माझ्या,पाळणार कोण आहे?
मी आगीत त्या,निजल्यावरी शांत
फसवे चटके लागून,पोळणार कोण आहे?
येता माझी कधी,आठवण ती एकटयात
गाली हसून सांगा,टाळणार कोण आहे?
रंगता मैफिल माझ्या,सरलेल्या जगण्याची
गझल म्हणुनी अश्रु,गाळणार कोण आहे?
करुनी सारे हे दिखावे,मी काळ।त दडल्यावर
एका तपानंतर मला,ओळखणार कोण आहे?
आजच ठरवा मला,जाळणार कोण आहे?
सूतक जाण्याचे माझ्या,पाळणार कोण आहे?

- राहुल सिद्धार्थ साळवे

मी...

तुझ्या वाळवी लागलेल्या
काव्य पत्राला
मी
नव्याने जन्म देण्यास
लेखनीला गळ घातली..
तेव्हा कळले मला
की,त्याची शाई
विलीन झाली आहे
त्या तुझ्या
आठवणींच्या
गंज लागलेल्या
भावनांमध्ये ...
मी
सुन्न झालो..!
ते शब्द
त्या पत्रातून
भूसा होऊन
गळताना पाहून....
अखेर
दिला सोडून मी
तुला
पुन्हा त्या
शुन्यापासून
रेखाटण्याचा
अट्टहास
अखेर
दिला सोडून मी.

- राहुल

आता कुठे

आता कुठे पहाट
होऊ लागली आहे
किरणे शह अंधाराला
देऊ लागली आहे
आता नको करूस
मागे फिरायाची गोष्ट
मृत जाणिवा अंतरी
पेटू लागली आहे
हे गीत माझे मलाच
जगण्याचे माझ्या गाऊ दे
आता कुठे हुंकाराला
स्वर वेल फुटू लागली आहे
आता कुठे पहाट
होऊ लागली आहे
काळे।खा विरोधात ती
उभी ठाकली आहे
आता कुठे पहाट
होऊ लागली आहे

- राहुल

संघर्ष ?

संघर्ष ?
कोणाचा ?
कोणाशी ?
माहीत नाही.
आम्हाला फ़क्त गर्दित,
आमची जागा बनवायची आहे.

काय?
नाही नाही,
आम्ही नाही मानत जातीयता.
पण धर्म ही नाही मानत.
त्याचा आणि आमचा,
३६ चा आकड़ा आहे.
हे बघ?
उगाच आंदोलनाची भाषा नको शिकवू.
आताच झेंड्याला धरून आलोय.
कोणाच्या तरी नावानं बोंबलून आलोय.
कोण होतं?...नाही माहित.
कोणासाठी होतं?...नाही माहित.
पण ज़िव तोडून घोषणा दिल्या.
आणि मिळवली त्यात,
एक बिर्याणी आणि चपटी.
बाकी मग चुलीत जाऊ.
मल़ा नको सांगू रे ती,
अंदोलनाची...लढ्याची गोष्ट.
माझ्यासाठी जात धर्म एकचं आहे,
ती म्हणजे भूक.
अस्मिता...अस्तित्व,
याचा विचारपण नाही येत डोक्यात,
आतड्याचा पिळ सोडवता सोडवता.
बाकी मग कोणाचं मला घेणं नाही.
तू दे पोटाला खायला?
तुझा पण झेंडा घेईन खांद्यावर,
पण ढेकर देई पर्यंतच.
बातच करायची झाली,
संघर्षाची?
तर आमचा, तुझ्या सारखा नाही.
तूटपूंजा.
कारण आमचा संघर्ष,
माणसासाठी नाहीतर,
मानवतेसाठी आहे.
इतकं लक्षात ठेव,
पुन्हा परत आमच्यावर,
बोट उचलताना.
इतकं लक्षात ठेव

- राहुल सिद्धार्थ साळवे

माय मुक्त हो...

माय मुक्त हो गं आता,
या अंध विश्वासाच्या दलदलीतून.
किती दिवस अजून तू अशीच,
खितपत पडणार आहेस?
तुझ्या अस्तित्वाला पदरात झाकून.
माणूस आभाळ।च्या पल्याड पोहचलाय माय.
आणि तरी तू चुलीतच रमलेली.
त्या हातावरच्या रेषांच,
दे सोडून आता खुळ.
बस झालं आता तुझं ते,
नजरा खाली करून असलेलं,
रुढी परंपरेच जगणं.
कपाळ।वरच ते,
स्वतः पेक्षा जास्त जपलेलं ,
जबरदस्तीचं गोंदन.
या सार्याला आता मिटवून टाक.
कायमच तुझ्यातूंन.
आणि घे नव्याने जन्म मग,
त्या सावित्री माई सारखा.
जिजाऊ सारखा.
तेव्हाच या मातीत उदयाला येईल,
पुन्हा कोणीतरी ज्योतिबा...शिवबा.
दे माय या कलंकित झालेल्या,
संस्कृतीच्या मुस्कटात.
वेळ आलीया आता.
तुझ्या ललकाराची.
तुझ्या विद्रोहाची.
तुचं जन्माला घालू शकते.
उद्याचा परिवर्तनवादी,
माणूसरूपी सूर्य.
नाहीतर हा,
दिवसा ढवळ्या पडलेला अंधार,
कधी सगळ गिळून टाकेल?
कळणार पण नाही.
सोड आता तो हात.
जो त्या,
चालीरीतिंच्या बेड्यात अडकलाय.
आणि मुक्त हो गं माय....मुक्त हो.

- राहुल सिद्धार्थ साळवे

किती भारी ना ?

किती भारी ना ?
पिंट्या रोज शाळेच्या गणवेशात,
तेही पाच किलोमीटर सायकलवर जातो.
पण...पाणी भरायला.
तशीच चिंगीबी जाती,
पाटलाच्या शेतावर,
मोलमजूरी करायला.
करेल तरी काय सांग?
तिलाच सोय करायची आहे,
तिच्या हुंड्याची.
काय?....नाही नाही,
चिंगी नाही बसत स्त्री मुक्तित.
ती सक्तित आहे,
पोटासाठी.
लागलाय ना गावच्या बाहेर बोर्ड.
की, " पुढे शाळा आहे."
पण ती पिंट्या चिंगीची नाही.
त्यांची रात्री भरते .
डोळे झाकले की,
अंधाराच्या गोड स्वप्नात.
हागणदारी मुक्त योजना ना?
आली ना, आली आली.
पण संडासाच,
खालच्या वरच्या अंगाच,
राजकारण घेऊन.
साहेब रस्ता पोहचला ओ गावात.
पण तुमची ती विद्येची देवता,
आमच्या माळरानात,
फिराकली बी नाही.
साहेब,
काय तुमचा तो आहे ना,
incredible india?
तो तुमचा तुम्हालाच ठेवा.
आम्हाला आमचा भारत द्या.
बाकी काही नको.
कारण,
पिंट्या अन चिंगीला,
एक वाक्य पाठ आहे. की,
'भारत माझा देश' आहे.
हेच वाक्य उद्या जर,
रामदास फुटानेंच्या,
'भारत कधी कधी माझा देश आहे".
असे झाले तर ,
नवल वाटून घेऊ नका.
आजच सांगतोय.
बाकी मग तुमची मर्जी.

- राहुल सिद्धार्थ साळवे