Monday, January 16, 2023

बांडगूळ वाणी

अरे तो पुरोगामिचा सूर्य ?
फितूर झाला ?
त्या मानसिकतेच्या अंधारात?
मग आता?
आता काय बडवायच?
नवीन काही आहे की नाही?
पण अर्थशून्य पाहिजे बरं?
त्या पुरोगामी सारखं.

मजा येती रे चघळ।यला.
वेळ आली की द्यायचं थुकुन.
त्यात काय एवढं?
काय?
नाय नाय लाज कशाला वाटती?
यालाच म्हणतात माणूस,
खाजव़ून खरूज करणारा.
त्यात आपली थोड़ी भर,
बांडगूळ।वाणी.
एवढचं.

- राहुल सिद्धार्थ साळवे

आजच ठरवा..

आजच ठरवा मला,जाळणार कोण आहे?
सूतक जाण्याचे माझ्या,पाळणार कोण आहे?
मी आगीत त्या,निजल्यावरी शांत
फसवे चटके लागून,पोळणार कोण आहे?
येता माझी कधी,आठवण ती एकटयात
गाली हसून सांगा,टाळणार कोण आहे?
रंगता मैफिल माझ्या,सरलेल्या जगण्याची
गझल म्हणुनी अश्रु,गाळणार कोण आहे?
करुनी सारे हे दिखावे,मी काळ।त दडल्यावर
एका तपानंतर मला,ओळखणार कोण आहे?
आजच ठरवा मला,जाळणार कोण आहे?
सूतक जाण्याचे माझ्या,पाळणार कोण आहे?

- राहुल सिद्धार्थ साळवे

मी...

तुझ्या वाळवी लागलेल्या
काव्य पत्राला
मी
नव्याने जन्म देण्यास
लेखनीला गळ घातली..
तेव्हा कळले मला
की,त्याची शाई
विलीन झाली आहे
त्या तुझ्या
आठवणींच्या
गंज लागलेल्या
भावनांमध्ये ...
मी
सुन्न झालो..!
ते शब्द
त्या पत्रातून
भूसा होऊन
गळताना पाहून....
अखेर
दिला सोडून मी
तुला
पुन्हा त्या
शुन्यापासून
रेखाटण्याचा
अट्टहास
अखेर
दिला सोडून मी.

- राहुल

आता कुठे

आता कुठे पहाट
होऊ लागली आहे
किरणे शह अंधाराला
देऊ लागली आहे
आता नको करूस
मागे फिरायाची गोष्ट
मृत जाणिवा अंतरी
पेटू लागली आहे
हे गीत माझे मलाच
जगण्याचे माझ्या गाऊ दे
आता कुठे हुंकाराला
स्वर वेल फुटू लागली आहे
आता कुठे पहाट
होऊ लागली आहे
काळे।खा विरोधात ती
उभी ठाकली आहे
आता कुठे पहाट
होऊ लागली आहे

- राहुल

संघर्ष ?

संघर्ष ?
कोणाचा ?
कोणाशी ?
माहीत नाही.
आम्हाला फ़क्त गर्दित,
आमची जागा बनवायची आहे.

काय?
नाही नाही,
आम्ही नाही मानत जातीयता.
पण धर्म ही नाही मानत.
त्याचा आणि आमचा,
३६ चा आकड़ा आहे.
हे बघ?
उगाच आंदोलनाची भाषा नको शिकवू.
आताच झेंड्याला धरून आलोय.
कोणाच्या तरी नावानं बोंबलून आलोय.
कोण होतं?...नाही माहित.
कोणासाठी होतं?...नाही माहित.
पण ज़िव तोडून घोषणा दिल्या.
आणि मिळवली त्यात,
एक बिर्याणी आणि चपटी.
बाकी मग चुलीत जाऊ.
मल़ा नको सांगू रे ती,
अंदोलनाची...लढ्याची गोष्ट.
माझ्यासाठी जात धर्म एकचं आहे,
ती म्हणजे भूक.
अस्मिता...अस्तित्व,
याचा विचारपण नाही येत डोक्यात,
आतड्याचा पिळ सोडवता सोडवता.
बाकी मग कोणाचं मला घेणं नाही.
तू दे पोटाला खायला?
तुझा पण झेंडा घेईन खांद्यावर,
पण ढेकर देई पर्यंतच.
बातच करायची झाली,
संघर्षाची?
तर आमचा, तुझ्या सारखा नाही.
तूटपूंजा.
कारण आमचा संघर्ष,
माणसासाठी नाहीतर,
मानवतेसाठी आहे.
इतकं लक्षात ठेव,
पुन्हा परत आमच्यावर,
बोट उचलताना.
इतकं लक्षात ठेव

- राहुल सिद्धार्थ साळवे

माय मुक्त हो...

माय मुक्त हो गं आता,
या अंध विश्वासाच्या दलदलीतून.
किती दिवस अजून तू अशीच,
खितपत पडणार आहेस?
तुझ्या अस्तित्वाला पदरात झाकून.
माणूस आभाळ।च्या पल्याड पोहचलाय माय.
आणि तरी तू चुलीतच रमलेली.
त्या हातावरच्या रेषांच,
दे सोडून आता खुळ.
बस झालं आता तुझं ते,
नजरा खाली करून असलेलं,
रुढी परंपरेच जगणं.
कपाळ।वरच ते,
स्वतः पेक्षा जास्त जपलेलं ,
जबरदस्तीचं गोंदन.
या सार्याला आता मिटवून टाक.
कायमच तुझ्यातूंन.
आणि घे नव्याने जन्म मग,
त्या सावित्री माई सारखा.
जिजाऊ सारखा.
तेव्हाच या मातीत उदयाला येईल,
पुन्हा कोणीतरी ज्योतिबा...शिवबा.
दे माय या कलंकित झालेल्या,
संस्कृतीच्या मुस्कटात.
वेळ आलीया आता.
तुझ्या ललकाराची.
तुझ्या विद्रोहाची.
तुचं जन्माला घालू शकते.
उद्याचा परिवर्तनवादी,
माणूसरूपी सूर्य.
नाहीतर हा,
दिवसा ढवळ्या पडलेला अंधार,
कधी सगळ गिळून टाकेल?
कळणार पण नाही.
सोड आता तो हात.
जो त्या,
चालीरीतिंच्या बेड्यात अडकलाय.
आणि मुक्त हो गं माय....मुक्त हो.

- राहुल सिद्धार्थ साळवे

किती भारी ना ?

किती भारी ना ?
पिंट्या रोज शाळेच्या गणवेशात,
तेही पाच किलोमीटर सायकलवर जातो.
पण...पाणी भरायला.
तशीच चिंगीबी जाती,
पाटलाच्या शेतावर,
मोलमजूरी करायला.
करेल तरी काय सांग?
तिलाच सोय करायची आहे,
तिच्या हुंड्याची.
काय?....नाही नाही,
चिंगी नाही बसत स्त्री मुक्तित.
ती सक्तित आहे,
पोटासाठी.
लागलाय ना गावच्या बाहेर बोर्ड.
की, " पुढे शाळा आहे."
पण ती पिंट्या चिंगीची नाही.
त्यांची रात्री भरते .
डोळे झाकले की,
अंधाराच्या गोड स्वप्नात.
हागणदारी मुक्त योजना ना?
आली ना, आली आली.
पण संडासाच,
खालच्या वरच्या अंगाच,
राजकारण घेऊन.
साहेब रस्ता पोहचला ओ गावात.
पण तुमची ती विद्येची देवता,
आमच्या माळरानात,
फिराकली बी नाही.
साहेब,
काय तुमचा तो आहे ना,
incredible india?
तो तुमचा तुम्हालाच ठेवा.
आम्हाला आमचा भारत द्या.
बाकी काही नको.
कारण,
पिंट्या अन चिंगीला,
एक वाक्य पाठ आहे. की,
'भारत माझा देश' आहे.
हेच वाक्य उद्या जर,
रामदास फुटानेंच्या,
'भारत कधी कधी माझा देश आहे".
असे झाले तर ,
नवल वाटून घेऊ नका.
आजच सांगतोय.
बाकी मग तुमची मर्जी.

- राहुल सिद्धार्थ साळवे

आज पुन्हा माझ्या मातीला

आज पुन्हा माझ्या मातीला ,
पारतंत्राचे ग्रहण लागले आहे.
फ़क्त तिच्यात माळलेले,
माळलेले कसले?...खोचलेल,
असंख्य झेंडे तिच्याच लेकरांचे आहेत,
याचेचं दुःख.

रक्तबंबाळ केले तिला,
तोडूनी तिचे लचके.
आणि तरी वर माय म्हणून मिरवायला,
लाज विकून खाल्ली पठ्यांनी.
त्या अस्मितेच्या खोट्या टिळ्यापायी.
एकाचं इतिहासातला...पण,
प्रत्येकाने सोयीनुसार निवडून घेतला आहे.
त्याच्या पुरता कामी येणारा संदर्भ.
बाकी राखून ठेवलेत,
हातचे म्हणून,
कुरघोडी करण्यासाठी.
धर्मकारणाच्या आकडेमोडीत.
संयुक्त शब्दाचीही फोड़ करून,
त्याला विभागून टाकले.
एकाच रंगाच्या...दोन गटात.
त्याच गटाला पुढे नाव प्राप्त झाले,
जातीयवादाचे.
आज जणू त्याच जातीयवादाचा,
उरुस साजरा होतोय.
वैचारिक, पुरोगामी बोकड़ाचा,
बळी दिला जातोय.
त्यानेच बरबटून गेली आज,
माझी माती माय.
तरी कोणीतरी बोंबा ठोकतोय.
आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत,
पण साला कागदोपत्री.
हे मान्य करायला लाज वाटते त्यांना.
अहंकाराच्या जखमेतून वाहतोय,
मी पणाचा पू.
तरी मानवतेची व्याख्या अबाधित.
प्रत्येकाची आपली,
आपली चामडी वाचवण्यासाठी.
या सगळ्यात पुरती फसलीस माय तू,
पुरती फसलीस.

- राहुल सिद्धार्थ साळवे

लेकरु

खाली या मायचा तडा गेलेला उर.
वर त्या मायची भेगाळलेली पायवाट.
जणू दुःखाची दुःखाशी,
होणारी गळ।भेट,
हृदयाची हजार शक्ले केल्याशिवाय,
राहत नाही.

एकीचा पान्हा दुष्काळ।ने आटलेला.
तर दुसरीचा,
भूकेपायी जळ।लेला.
दुःख दोघींचही सारखंच.
पोटच्या उपाशी लेकराचं.
तेही तुझ्या २१ व्या शतकातील,
हरितक्रांतीच्या जमान्यात.
एकीला द्यायला काही नाही.
तर ,दुसरीला घ्यायला काही नाही.
दोघीही फाटक्याचं.
त्याही समांतर.
पण, तुझ्या मानवी मग्रुरी पुढे,
लाचार नाही झाल्या कधी.
त्यांच कर्तव्य बजावत राहिल्या.
आटलेल्या...जळलेल्या,
पान्हासोबत.
तेही स्वाभिमानानं.
तुला नाय कळ।यची,
मायची कळ.
आणि बळही.
नाय कळ।यचं तूला.
त्यासाठी लेकरु म्हणून जगावं लागतं.
अखेरपर्यंत.
नाळ तुटली तरी.
जगावं लागतं अखेर पर्यंत,
लेकरु म्हणून.
लेकरु होऊंन.
आणि लेकरुच राहून.

- राहुल सिद्धार्थ साळवे

मी विसरलोय जगायचे...

चतकोर त्या भाकरीने,
माझी जिंदगी गुलाम केली आहे.
कधी भुकेचे बहाणे.
कधी जगण्याची भीती.
तर कधी परिस्थिती.
जणू सारेकाही आधीच ठरवलेले.

अडकून गेलोय पुरता मी.
या चौकटधारी भाकरीच्या जंजाळ।त.
तरी सांगतोय मी छाती ठोकून,
की, जगतो आहे..
मनासारखे नक्कीच नाही.
पण जगतोय.
त्या घड्याचे काटे,
नाचावतात मला त्यांच्या तालावर.
तो उगवणारा सूर्य,
तो मावळणारा चंद्र ठरवतो.
मी जगलेला प्रत्येक दिवस,
प्रत्येक रात्र.
माझ्या नाडिचे ठोके ठरवतात की,
मी जिवंत आहे.
माझ्या श्वासांची घालमेल,
माझ्या ह्रदयाची धडधड,
पुरावा देतात मी असल्याचा.
या सार्यातून मुक्त होऊ म्हंटले तर,
लेबल तयार आहेच ,
मरण नावाचे.
ते शेवटचे क्रियापद.
भरकटलोय मी,
काय असते जगणे हे शोधता शोधता.
जिंकण्याच्या नादात,
पैशाच्या विचारात,
मी विसरलोय जगायचे.
मी विसरलोय जगायचे.

- राहुल सिद्धार्थ साळवे

खटला...

अर्धे गुन्हे उराशी कवटाळुन,
तू मला माझ्या समानतेचा,
जर धड़ा शिकवत असशील?
तर लक्षात ठेव की,
मी अन्यायाच्या चुलीवर,
माझी भाकर भाजणार नाही.
मी स्वाभिमानाला माझ्या,
तुझ्या बुडाखाली ठेवणाऱ नाही.
तुझ्या मानसिक मानवतावादी,
माजुरड्या मानवतेला,
मी पुन्हा घालतो की नाही बघ,
तो पारतंत्राचा बुरखा.
मग तू मला जन्मठेप दे,
की दे मला फाशी.
मी जाता जाता तुला,
माणसाची,
माणुसपणाची व्याख्या,
बिन व्याजी देऊन जाईल.
जर तू माझ्यावर,
देशद्रोहाचा खटला भरू शकला तर.
जर तू माझ्यावर,
खटला... भरू शकलास तर.

-राहुल सिद्धार्थ साळवे

जब्या

जब्या
मला आठवतंय
चाणाक्ष जाणकारांनी
म्हटले होते की
तू भिरकावलेला दगड
त्या जीर्ण झालेल्या
मानवी व्यवस्थेवर होता
मी तिच व्यवस्था शोधतोय
त्या व्यवस्थेत
मला स्वत:ला
कधी मोजुन
कधी गुणून
तर कधी
अक्षरशः भागून.

त्या पड़द्याच्या आडून
तुझा सामाजिक आक्रोश
त्या डॉल्बीतुन
त्यांच्या मनाचे इमले
उध्वस्त करून गेला.
पण
त्या दाराच्या बाहेर निघताना
नागराजने
वैचारिक रित्या
अर्धवट सोडलेला प्रश्न
त्या खुर्चीवरच
सोडून आलेत ते.
मी तो प्रश्न शोधतोय
जो त्यांनी टाळयांच्या गजरात
लपवू पाहिला आहे.
कारण सुशिक्षित समाजाची
गाजर पुंगी वाजवून
विकासाचा
प्रगतीचा
डंका वाजवणाऱ्या त्या
स्विकृत समाजसेवकांना
मला तुझ्या बहिणीचे
त्या मेहंदीला
खरडून रंगवलेले
ते हात दाखवायचे आहेत.
बालमजूरीचा
लॉगं टर्म प्रोग्राम
आखणाऱ्या त्या
कैंडल मार्च प्रेरित
पांढरपेशी जमातीच्या
एका जिन्सच्या नादात
तू गहाण टाकलेली
तुझी निरागसता
मला लख्ख उजेडात
त्यांच्या
कागदोपत्री अजेंड्यावर
छापायची आहे.
जब्या
तुझा पत्ता दे जब्या
मला भेटायचं आहे तुला
खुप बोलायचं आहे तूझ्याशी
त्या व्यवस्थेवर
तिच्या अवस्थेवर
व्यथेवर
आणि
समाजाचा मानसिक आलेख
पाहण्यासाठी तू सोडलेल्या
त्या अधुऱ्या
सामाजिक
पण प्रलंबित कथेवर.
कारण
तुझ्या डोळ्यात मला
मी शोधत असलेला
उद्याचा परिवर्तनवादी
तरुण दिसला
त्याच तरुणाला मला
विचारायचे आहे
तो दगड
खरचं कोणाविरुद्ध होता ते?
सांगशील ना?
त्या व्यवस्थे विरुद्ध होता की
माणसाच्या
गढूळ मानसिकते विरुद्ध होता?
सांगशील ना जब्या?
सांगशील ना?

- राहुल सिद्धार्थ साळवे

संसार

संसार
कोसळल्या उभ्या
भिंती जरी
पण संसार मात्र
अजूनही
पाय रोवून उभा आहे...

एका कोपर्यात
आ वासून पडलेल्या
जर्मनच्या पातेल्याला
लागलेली कलई
मला काहीतरी
सांगू पाहत आहे...
चेंबलेल्या तांब्यावर
अजूनही शाबूत असलेले
आम्हा
नवरा बायकोचे
कोरीव नाव
मला खुणावत आहे...
रांगोळी सारखं
सैरा वैरा पडलेलं
पांढरं फिकट पीठ,
लाल...तिखट
हळद...मीठ
सारं काही एकमेकांत
अगदी विलीन झाल्यासारखं...
फ़क्त
ढिगार्याच्या आड़
धगधग करणारा तो
चुलितला जाळ
मला माझ्या
मनात उतरवून घ्यावा लागेल
नव्याने पेटून
उठण्यासाठी...
लाल...तिखट
हळद...मीठ
एकमेकांतून
मुक्त करण्यासाठी...
उपड्या पातेल्याला
सोयीचे करण्यासाठी...
तांब्यावरचे तिचे माझे नाव
शाबूत ठेवण्यासाठी...
आणि
कोसळलेल्या भिंतीं
पुन्हा उभ्या करण्यासाठी...
कारण
त्या भिंती कोसळल्या आहेत
पण
पण संसार मात्र
अजूनही
पाय रोवून उभा आहे
पण संसार मात्र
अजूनही
पाय रोवून उभा आहे...

-राहुल सिद्धार्थ साळवे

हे जिंदगी

हे जिंदगी तुझ्या जगण्याचा
उरुस साजरा करतो
त्या सूर्य चंद्र तार्यास
तुझ्यापायी गुलाम करतो
तू अशीच माझ्या वाटेवर
काटे ते पसरत जा
मी रक्तरंजीत पावलांनी
त्यांना फुलात माळतो
हा खेळ तुझा निर्दयी
असा गं जिंदगी
पण त्यानेच मला
मी रोज नव्याने भेटतो


-राहुल सिद्धार्थ साळवे

सांग मी ?

काळी माय,गरीब गाय
दोष तिला देऊ कसा?
पावसाने दिला धोका
आभाळ। सांगू कसा?
पेरलेले दाणे माझे
आसवांचे गायी गाणे
रक्त माझे मातीस या
सांग मी पाजू कसा?
गळफास माझ्यासाठी
नाही तो पर्याय आहे
लटकूनी लेकरांना
पोरका करू कसा?
माय तुझ्या नरड्यात
घाम माझा ओतीन
भागेल तहान तुझी
सांग मी वदू कसा?

-राहुल सिद्धार्थ साळवे

सावित्रीमाई !

सावित्रीमाई !
आज ती शिकली
स्वावलंबी झाली
वैचारिक झाली
इतकेच नाही तर
साता समुद्रा पार गेली
त्या चुल आणि मूल
या धर्मांध चौकटीला
बेधड़क ओलांडून.

सावित्रीमाई !
तू तिला जगायला शिकवले
जगवायला शिकवले
स्वाभिमानाने राहायला शिकवले
तिने तुला तिच्यात उतरवून
या पाखंडी संस्कृतीला
मुठ माती देत
दाही दिशा उजळून टाकल्या
त्या बद्दल
तुझे आभार सावित्रिमाई.
धर्म आणि कर्म यातला
धरती आणि आभाळ
इतका मोठा असलेला फरक
तू सिद्ध करून दाखवलास
ते ही तू
तुझ्या वाटे आड़ येणार्या प्रत्येकाला
विदूषक म्हणून.
मी सुन्न होतो माई
तुला वाचताना
समजुन घेताना
नतमस्तक होताना
आणि आमच्या माता भगिनी
सावित्रिच्या लेकी म्हणून
गौरवाने नांदताना.
आज स्त्री शिक्षणाचा
उगाच गाजावाजा होताना
तुझी पेरलेली ही मुळे
विस्तृत होत आहेत
याचाच आनंद.
सावित्रीमाई !
तुझे उपकार आम्हाला
फ़ेडणे शक्य नाही
पण तुझ्या कार्याचा
तुझ्या लढ्याचा
आणि नक्की विचारांचा वारसा
पुढे घेउन जाण्याचा
प्रयत्न करू
इतकेच आज तुला
वंदन करताना.

- राहुल सिद्धार्थ साळवे

"सावित्रीमाई फुले यांच्या 184व्या जयंती निमित्त त्यांच्या
कार्यास आणि विचारास विनम्र अभिवादन.."

भाकरीत चंद्र

भाकरीत चंद्र शोधत
माय रात्र जाळत होती
बा ने तर बाटलीतच
आभाळ एकवटले होते
आणि मी
चुलीतून
अस्ताव्यस्त उडणाऱ्या त्या
ठिंणग्यान मध्ये
तार्याची सप्तर्षी शोधत
त्या ध्रुवाला
चाचपडत होतो
कारण सार्यांच्या पोटाला
भूक नावाच्या सुर्याचे
ग्रहण लागले होते
आणि हे सारचं
त्याला साकडं घालायचं
जळकं गार्हान होतं
रडत रडत जळणाऱ्या
चिमनिला साक्षी ठेवून
जळकं गार्हान होतं


-राहुल सिद्धार्थ साळवे

घेऊनी खांद्यावरी झेंडा

घेऊनी खांद्यावरी
झेंडा हा निघालो
होती सोबतीला
तीही वाट चुकलो
घोषणा नार्यान पुरता
आक्रोश माझा उरला
समजुनी भलत्यास विठ्ठल
त्याच्या पुढे झुकलो
हातावरील रेषा
दांड्यात लुप्त झाल्या
विकताना स्वाभिमान
राज्यकर्ती खेळी शिकलो
कळलेच नाही कधी
मी त्यांचा काटा झालो
कार्यकर्ती जात माझी
मी तिचा गुलाम झालो
आज उलटे पडले फासे
मी तेव्हा राखून फसलो
दोन घोट पाण्यासाठी
चितेवर त्या नग्न जळलो

-राहुल सिद्धार्थ साळवे

अंधाराला मी म्हणालो

अंधाराला मी म्हणालो
उगाच वाट अडवू नको
काजवा येउनी सांगुन गेला
तुझी मग्रुरी येथे नको
मी तार्यांनाही आवाज दिला
त्यांनी आभाळ।चा पड़दा सारला
चंद्राला मी घालता गळ
त्याने न ऐकल्याचा आव आणला
आता नको कुणाची
ती साथ मला चालाया
मी माझ्या उगवण्याचा
मार्गच तो बदलला
मी माझ्या उगवण्याचा
मार्गच तो बदलला.

- राहुल सिद्धार्थ साळवे

मी मरणाच्या भितीने

मी मरणाच्या भितीने

जगणे सोडू कशाला
लाखाचे आहे हसने माझे
उगा मग रडू कशाला

मी मोजतचं नाही
त्या श्वासांचे एक एक पान
जे वाचायचेच नाही
ते उलगडू कशाला

मी मुक्त आहे तुझ्या
विस्तीर्ण आभाळ।त या
चौकटी बांधून त्या
मग उडू कशाला

नको करू नाद माझा
वेळ करतो गुलाम मी
उजेडाचा आहे दिवाणा
मग अंधाराशी नाते जोडू कशाला

-राहुल सिद्धार्थ साळवे

घे थोड़े जाणून

घे थोड़े जाणून
वेळ सरत आहे
विचारात फुकट
रात ढळत आहे

धर हात आता
जिव जळत आहे
बघ दिवा आ वासून
मजा बघत आहे

दे झोकुन मिठीत
श्वास शहारत आहे
जागे तारे तुझ्यानादी
डोळे चोरत आहे

लाव पूर्ण विराम तो
ओळ चुकत आहे
तुझी कविताही माझे
शब्द मोजत आहे

- राहुल सिद्धार्थ साळवे

 

काय भाषा

 काय भाषा

आहे जगण्याची
श्वासापेक्षा मोठी
गोष्ट भाकरीची

जन्म? मृत्यु?
सारेच अर्धवट
वणवण जिंदगीची
पोळणारी पायपिट

स्वाभिमान? अस्मिता?
निव्वळ शब्द खेळ
खळगी बोलते जेव्हा
लाखाची असते वेळ

आधाराची भिंत
नेहमीच सोबत खचलेली
पाण्याने जाळता भूक
जिंदगी असते कळलेली

   पाण्याने जाळटा भूक
   जिंदगी असते कळलेली

-राहुल सिद्धार्थ साळवे

 

माणसांचा बाजार

माणसांचा बाजार
मुखवट्याचा आजार
सारेच नंगे फिरती
होऊनी बेजार


कोणी भाकरीचा भुकेला
कोणी उपाशी चामडीचा
प्रत्येकाच्या हाती
जळतो अंगार


कोणाची जिंदगी साकी
कोणाची साकी जिंदगी
बिन वासाचीही रात
चढ़ते बेकार

फितूर होतो जेव्हा
सोनेरी दिवस
जिव जाणतो तो
नग्न अंधार

जत्राच आहे ही
जगण्याची उरुसातली
आपलाच फड आणि
आपलीच लावणी जोरदार

-राहुल सिद्धार्थ साळवे



करतो लिलाव

करतो लिलाव
या श्वासांचा
खरीदार नाही
पण इथे


मी वाजवतो
डंका दुखाचा
ऐकण्यास कोणी
नाही इथे

काटा जिव्हारी
रुतलाय उभा
फुलाची कळी
नाही इथे

कबर खोदली
मातीत ती
मातीला गंध
नाही इथे

जळलो सारा
आगीत हसत
स्वप्न जळत
नाही इथे

काय साली
जन्माची कहानी
शेवट तिला
नाही इथे

- राहुल सिद्धार्थ साळवे

 

घाव माझे जुनेच आहेत

घाव माझे
जुनेच आहेत
दुगने झाले
दुःख फ़क्त

जखमा झाल्या
पुन्हा ताज्या
वाहणारे ते
पुरानेच रक्त

खपलीत लपलेली
होती वेदना
चिघळून केले
श्वास मुक्त

आसवांच्या त्या
ओल्या पंढरी
'सल' विठू
मी भक्त

काही वण
सुकले उन्हात
पण जगण्यास
हवेत सक्त

जिंदगी कसली
वेदने बिगर
ती नाही तर
जगणेच रिक्त

- राहुल सिद्धार्थ साळवे


कट पुतली

कट पुतलीच्या गोजिरवाण्या बाहुलीसारखी,
झाली आहे माणसाच्या,
जगण्याची तर्हा.
खोट्या आयुष्याच्या या,
दिखावू रंगमंचावर.
सारे चेहरे रंगवलेले.
मुखवट्यात लपलेले.
रोज नवे डाव.
रोज नवे खेळ.
आणि रोज पडद्यामागचा,
नवा गोंधळ.
कोणाची लाखाची मुठ झाकलेली.
कोणाचे हात पसरलेले.
तर कोणी सारेच रिकामे घेऊन,
देव पूजेला लागलेले.
प्रत्येकाची दोरी कोणाच्या तरी हाती.
कोणी त्याला गुलामी म्हणतो.
कोणी चाकरी.
कोणी सेवा.
तर कोणी,
ऋणानूबंधाची फूस जोडतो.
सारा मनाच्या कमकुवतेचा बाजार.
भीतीच्या भितीतून,
मातीत जाईपर्यंत जडलेला आजार.
काय शोधायच अजून?
हिच आहे खरी ती अंधश्रद्धा.
जी तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाने,
स्वावलंबी बनवत नाही तर,
जखडून ठेवते.
मुक्त होण्याच्या नादात,
तुमची व्यक्तता मारून टाकून.
तीही अखेरपर्यंत.
पण,
रोज नवे लेबल लावून.
हाच काय तो फरक.
फरकच राहिलेला.

-राहुल सिद्धार्थ साळवे

तू लाख करशील

तू लाख करशील त्या,
स्त्रीवादी समाजाचा गवगवा.
तरी तूला करावाच लागेल,
मान्य तो,
स्त्री पुरुषाला विभागणारा,
परिवर्तनवादी माणूस.

चारचौघात आजही दिलखुलास हसणारी,
चर्चेचा विषय ठरते,
इतिहास घडवणारी,
ती स्त्री.
वंशाच्या वाढीचा दोष,
रोष,
आणि बरेच काही पचवते ती,
घराचा उंबरठा ओलांडताना,
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून,
लढ़णारी...जिंकणारी...जगणारी,
ती जणू पंख छाटलेली,
स्त्री रूपी फिनिक्सच.
नाही म्हणुच शकत नाहीस तू.
करावेच लागेल मान्य तूला,
तुझ्या पुरुषार्थात अडकलेली,
तुझी अर्धांगिनी.
तुझी माय.
तुझी लेक.
आणि बहिणही.
जरी असेल तुझा विरोध,
माझ्या या मताला?
तर आधी,
तू तुझ्यात डोकावून बघ.
आणि मग माझ्याशी वाद घाल.
त्या स्त्री स्वातंत्र...स्त्री समानतेचा.
मी तयार आहे,
तुझ्या बुळचट...पुरुस्कृत विचारांना,
तडा देण्यासाठी,
मी तयार आहे.

-राहुल सिद्धार्थ साळवे