Saturday, November 1, 2014

ती,
स्वतः लाच शोधत होती.
त्या महिला आरक्षणाच्या,
५० टक्यांच्या आकडेवारीत.
पण,
रेड लाईट मधील,
बंदिस्त खोलीच्या,
खिड़कीधारी असलेल्या,
फुटकी दुर्बीनितून.

ती नाही ठेवत ठपका.
तिच्यावर आलेल्या,
परिस्थितीवर.
अथवा नशिबावरही.
पण,
उन्हाच्या फसव्या प्रतिबिंबाला,
मृगजळ मानून बसल्याचे दुःख,
तिच्या पापणीवर,
सदैव तरंगताना दिसते.

त्या अंधारमय रंगीत जगात,
परिवर्तनाचा कवडसा,
डोकावेल का?
हे रोज उगवणारा,
तो धर्मनिरपेक्ष सूर्यही,
नाही सांगू शकत.

दोन पावलांचेच अंतर आहे,
मुक्त होण्यासाठी लागणारे.
पण तिला ते,
स्विकारायचे नाही.
कारण,
आगीची आणि फुफाट्याची गोष्ट,
ती जाणून आहे.

अखेर तीही माणूसच.
स्वतंत्र होण्याची,
तिलाही आहेच लालसा.
पण,
पंखात बळ एकवटण्याच्या नादात,
तो सूर्य,
पुन्हा तिला सोडून जातो.
त्याच ५० टक्य्यांच्या आकडेवारीत.
जे कधीच,
तिच्यासाठी नव्हते...नाही.
आणि कदाचित,
या पुढेही नसतील.
ह्या,
मुखवटाधारी,
समाजसेवा प्रेरित,
पांढ़रपेशी अश्या,
जिवंत माणसांच्या,
स्मशानात.
कोण म्हणते रक्त लाल असते म्हणून?
त्या खाणीत त्याचे रंग बदलले,
त्या माणूसरूपी...निरागस,
हिऱ्यांना विचार.
ते काळ।च सांगतील.
त्यांच्या रक्ताचा,
रोज नव्याने तयार होणारा,
प्रत्येक थेंब ना थेंब.

ते सूर्यही काळ। सांगतील.
ते चंद्रही काळ। सांगतील.
इतकचं काय,
ते स्वप्नही काळचं सांगतील.

ते नाहीच करणार मान्य.
की, कोळश्यात हिरा जन्म घेतो.
कारण त्यानेच त्यांचे बालपण जाळले.
अश्रुही काळेच देऊन.

आज रमलेत ते त्याच्यात.
त्या कोळश्यालाच आपली माय,
आणि त्या खाणीला,
आपलं जग मानतात ते.
कारण त्या घुसमटणार्या अंधारात,
त्या कोळश्याने त्यांना भाकरी दिली.
जगायला शिकवलं.
आणि रोज मरायलाही.

आम्ही?
आम्ही काय करू शकणार?
आम्ही वाजवणार,
बालमजूरीचे,
फुटके ढोल.
ते पण मोजक्याच,
बालदिनाचे औचित्य साधून.
तेही लाजेपोटी.
आम्ही फ़क्त वाजवणार.
ते फुटके ढोल.
वाजवणार.
त्यांच्या मेलेल्या निरागसतेचा,
जयघोष करत.
खोट्या आक्रोशा सोबत.
ढां ग ढां ग ढां ग ssssssssss
काय मास्तर? खोटं शिकवलं ना?
कुठे विभागली आहे पृथ्वी ?,
त्या रेखावृत्त कर्कवृत्तात.
ती तर फसली आहे,
या माणसांच्या,
वाकड्या तिकड्या मानसिकतेत.
जी माणुस रूपी आकृती,
कधीच बनू देणार नाही.

काय कसली फसवी सांगितली तुम्ही ती,
धर्मनिरपेक्षतेची व्याख्या.
अहो पावलो पावली तोंडावर पडतात येथे,
तुमच्या पुस्तकधारी नागरिक शास्त्राची,
प्रत्येक विधानं...प्रत्येक कलमं.

भौतिक...जिव....रसायन,
सगळी बंडल शास्त्र.
हो बंडलच.
अजून म्हणु तरी काय मास्तर?
येथे एकच शास्त्र तेजीत आहे ओ.
गरिबालाही....आणि श्रीमंतालाही.
ज्याला जाणकार अर्थशास्त्र म्हणतात.
तेही अर्थ न समजता.

काय घेउन बसलात तुमच्या माय मराठीचं?
सुविचार, सुभाषिताच्या जागी ती,
शिव्यांनीच भलती सजली आहे.
आणि साहित्य बुरशिने.

इतिहासाचं न बोललेलचं बरं.
कारण तो रोज बदलतो.
भुकेनुसार.

सारं खुपचं विचित्र आहे मास्तर.
पण खरं आहे...अगदी वास्तव.
फ़क्त आता खोटं होतं का सारं ?,
तुम्ही शिकवलेलं....तेवढचं सांगा.
कारण लोकं हसत आहेत मास्तर माझ्यावर.
द्या उत्तर आता मास्तर.
बघ तिने कंबर कसली आहे आता.
तुझ्या जुल्मी पुरुषी अहंकाराला,
कायमचा मातीत गाडण्यासाठी.

ती गप्प होती आजपर्यंत,
कारण तिला ठाऊकच नव्हते,
तिच्या जगण्याचे नेमके विश्लेषण.

तू नादवून ठेवलसं तिला,
त्या सतीच्या मती शून्य गोष्टीत.
तिने त्यावरच थेट घाणा घातला.

तू नेहमी तिला त्या,
उंबरठ्याशी तोलू पाहिलसं.
तिने त्याचं उंबरठ्याला,
परिसिमेचं स्वरुप दिलं.
आणि त्याला लाथाडून आज ती,
निघाली आहे.
तू रंगवून ठेवलेल्या तिच्या,
खोट्या इतिहासाला जाळण्यासाठी.

बघ सांभाळ आता,
तुझ्यातल्या पुरुषी किड्याला,
ती ठेचून राहिल्याशिवाय राहणार नाही.

तिला झाली आहे आता,
तिच्या अस्तित्वाची ओळख.
जी तू तिच्यापासून,
तुझ्या स्वार्थासाठी वंचित ठेवली होती.

त्याचं अस्तित्वाचे आज,
शस्त्र झाले आहे.
तुझ्या गढूळ मानसिकते विरुद्ध,
लढा देण्यासाठी.

तुझ्या मातीत जर उद्या कोणी,
मलाला जन्माला आली तर,
नवल वाटुन घेऊ नकोस.
पण ती उशिरा जन्माला आली,
अथवा येईल.
याचे दुःख,
एक पुरुष असुनही राहिल.
तेही लाजिरवाणं.
कायमचं.