Saturday, November 1, 2014

आम्ही का बसू त्यांच्या पंक्तीत?
जे गलिच्छ, शिवीगाळ,
माध्यमांती शब्द वापरून ,
जन्माला येणार्या अपंग कवितेचे,
विद्रोही असे, नामकरण करतात.
ज्यांच्या तलवारीच्या पाती,
धार करून करून झिजल्या.
मशालिंचे दांडे धरुन धरुन,
हातावरच्या रेषा त्यावर उमटल्या.
१९ व्या वर्षात समाजकारणाची,
अर्धवट नागडी असलेली समाजव्यवस्था,
उगाच गवगवा करून विवस्त्र करणार्या,
स्वीकृत अभ्यासू, विचारवंतांना,
आम्ही का जाणकार म्हणू?
आगीचा चटका न घेताच,
त्याच्या ज्वलंतपणाचे मोजमाप करणारे,
मलातरी,
दुष्काळ।त हत्तीवरुन,
साखर वाटणारे वाटतात.
त्यांची साखर त्यांना लखलाभ.
नाहीतर चाखली म्हणून हिशोब मागतील.
आम्ही त्यांच्या दृष्टीकोनाला तडे नाहीच देत.
पण त्यांच्या विचारप्रणालीला,
जुमानत देखिल नाही.
साधन आणि माध्यमांच लेबल लावून जर,
त्यांच्या मनातील गरळ विकण्याच,
त्यांच षडयंत्र असेल तर?
ठिणगी टाकणारच.
भले खाक झालो तरी बेहत्तर.
नाहीतर,
समाजाच्या भरकटण्याच्या प्रवाहात,
त्यांच्यावरही फसवणूकिचा गुन्हा,
दाखल झाल्याशिवाय राहणार नाही.
शेवटी व्यक्ती आणि विचार स्वातंत्राच पिल्लू,
आम्हालाही ज्ञ।त आहे.
त्याचा बाऊ न व्हावा एवढेच.
बाकी मग हा छाती बडवून केलेला,
शब्दांचा अक्रोश त्यांना बहाल करताना,
किती यातना झाल्या त्या ,
नाही सांगू शकत.
कधीच नाही.

No comments:

Post a Comment