Saturday, November 1, 2014

हे अंधाराची गोष्ट सांगणाऱ्या भेकडांनो?
आम्ही ती गुलामगिरी तर ,
कधीच लाथाडली आहे.
आणि ते तुमच्या,
चंद्र सूर्य तार्याच समीकरण आहे ना?
घोळून पिलोय आम्ही.
म्हणून त्याची भिती,
आम्हाला नका दाखवू.
आमच्या रक्तानं लिहिली आहेत आम्ही,
आमच्या ज़िंदगीची,
प्रत्येक ओळनं ओळ.
आतड्याला पिळ देऊन देऊन लावलाय,
आम्ही आमच्या भाकरीचा शोध.
मर्जी नुसार ठरवली आहे,
आम्ही आमच्या जगण्याची दिशा.
नाही केलं तुमच्या त्या परिस्थितीनं,
आमच्या मनावर राज्य.
उलट आम्हीच तिला सिद्ध केलं.
तेही अपवादात्मक.
आमच्या जगण्याचा अंदाज,
तोही दुसर्या कोणी लावावा?
इतके दूबळे वाटलो का आम्ही तुम्हाला?
हातावरच्या त्या भेगांना,
जिवनरेषा समजणारी नाही जात आमची.
मनात आणलं तर,
पोटासाठी स्वतः ला गहाण ठेवू.
पण स्वाभिमानाला आरसा नाही दाखवणार.
तुमच्या त्या आखलेल्या,
चौकटधारी जगण्याची,
नाही रे पर्वा आम्हाला.
आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत.
आमच्या जगण्याला आम्हीच देऊ आकार.
तुमचा कागदोपत्री असलेला निकालनामा,
तुमचा तुम्हीच गोंजारत बसा.
भौतिक शास्त्राच्या...जिव शास्त्राच्या,
सोयीनुसार बनवलेल्या परिमाणात,
आम्हाला तूम्ही बसवुच शकणार नाही.
कारण जगणे मरणे आमच्यासाठी,
निव्वळ शब्दांचा खेळ आहे.
आम्ही जिवंत आहोत रे .
नुसते तुमच्या सारखे जगत नाही,
त्या श्वासांच्या भरोश्यावर.
एवढेच तुमच्या या,
फाटक्या झोळीत टाकताना.
तेही हसत हसत.

No comments:

Post a Comment