Monday, June 30, 2014

आज कुठे मला , कळले थोडे थोडे.
तेव्हा मन माझे , जळले थोडे थोडे.

मी वेडा उगाचच , जोडत राहिलो नाते.
तू मात्र शिताफिने , तोडले थोडे थोडे.

जेव्हा कळले का असे? , घडले हे नेमके.
श्वास हे बिलंदर तेव्हा , कोंडले थोडे थोडे.

कळलेच नाही मला , कधी झालो रक्तबंबाळ.
तू हसत हसत केसाने , चिरले थोडे थोडे.

मी स्वप्न घेऊनी उराशी , होतो तुझ्या भरोश्यावर.
तू आठवणींना हुशारीने , गाडले थोडे थोडे.

तूच केला होतास , गुंता आपल्या नात्याचा.
आणि तूच धागे सारे , विरले थोडे थोडे.

लोक म्हणतात मला , मी चुकत आलो.
जीव लावला तुला हेच , चुकले थोडे थोडे.

त्या वाळूवर लिहिलेले  , नाव आपले दोघांचे.
सरता अखेर किनारे , पुसले थोडे थोडे.

नको आता तू , ढाळू अश्रू दिखाव्याचे.
मी उरले सुरलेले ही , जाळले थोडे थोडे.

आज कुठे मला , कळले थोडे थोडे.
तेव्हा मन माझे , जळले थोडे थोडे.

राहुल सिद्धार्थ साळवे.

Sunday, June 29, 2014

मेलाय तो….
दिसतंय ना…
का …??
उगाचंच सरणावर….
ठेवलय….
त्याची हौस…
भागावी म्हणून….
नाही ना…??
मग आता बस करा….
गावकुसाबाहेरचा….
तमाशा….
अजून खूप….
बाऱ्या व्हायच्यात….
चुलबंद….
दहावा….
तेरावा….
सुतक….
सगळे सणवार….
होऊ द्या….

अहो….
नाळ त्याची तुटलीये….
तुमच्या घुंगरांचे…
चाळ तरी …
साबूत ठेवा….
बारा मास….
तुम्हावर हा दिस….
येई पर्यंत तरी….
काय माहिती….
कधी कोणाची….
सुपारी फुटल….??

थांबवा आता….
ती फुटकी पिपाणी….
तो फाटका ढोल….
तो बघा….
झुनझुना….
वाजतच नाही….
वाजल कसा …??
त्याला काही…
कळतंच नाही ….

चला….
भाषणं सुरु….
श्रद्धांजली….
दर्शन….
प्रार्थना….

चल फोड रे….
मडकं….
लावा रे आग….
१….
२….
३….
होऊन जाऊ द्या….
एकदा शेवटचा….
हंबरडा…
मढ….
सुटलं एकदाचं….
यांच्यासाठीच असलेल्या…
भावनांतून….
यांनीच दिलेल्या….
वेदनांतून….

पण हे बघा….
कलावंत….
यांचा ट्राय अजून…
चालूच आहे…
इमोशनल ब्लॅकमेल….
करत….
पिढीजात चालू असलेल्या…
रीतीरिवाजानुसार….
जणू काय….
गायनाची स्पर्धाच….
ट्रेनिंग दिल्यासारखं….
शार्प स्केल मध्ये….
हरकती घेत….
आलाप चढवत….
काहीजण वरच्या…
पट्टीत….
तर काही ….
खालच्या सुरात….

तो अगदी शांत….
डोळे मिटून…
मैफिलीचा आस्वाद घेत…
स्वतातच हरवत…
एकांतात रमलेला….
अगदी जाणकार…
श्रोताच….

काळरात्र सरेल ….
मैफिल संपेल….
आल्यापावली….
सगळे निघूनही जातील….
सुस्कारा टाकत ….
संपल सगळ…
अशी चर्चा रंगेल…
पण खरच का ….
सगळ संपेल …??

नाही….

पुन्हा….
पहाट होणारच आहे ….
काळरात्र तर फक्त
याची…
सरली…
आज पुन्हा एकदा….
सूर्य मावळणार आहे…
मैफिल तर….
तुमचीही कधीतरी…
रंगणार आहे….
खरच….
मढ….
सुटलं एकदाचं….
खरच...
सुटल...

Saturday, June 28, 2014

शशी ताई यांस.. शशी ताई....क्षमा करा....थेट बोलता येत नाही म्हणून हा पर्याय.....मार्क ने चांगली सोय केली आहे...म्हणून त्याचे आभार प्रथम .....खूप दिवसापासून ताई तुमच्या कविता वाचतोय.....पण दर वेळी वेगळीच रात्र, वेगळाच सुर्य, वेगळाच चंद्र आणि वेगळीच पहाट उलगडत आहे.....असा वाटते की शाळेत शिकवलेलं सगळं खोटं होतं की काय ?......की शशी ताई , रोज भेटते सूर्याला, चंद्राला,रात्रीला आणि पहाटेला.....सूर्य रोज येत असेल का चहा प्यायला शशी ताईच्या घरी?....रात्र येत असेल का शशी ताई ची अंगाई ऐकायला?.....या सार्या प्रश्नांनी भंडावून सोडलंय ताई......प्रतिक्रिया काही द्यावी तुमच्या शब्दांना तर हात थरथर कापतात......का ते माहित नाही...पण कापतात........एवढंच जाणून घ्यायचय ताई की, गोजिरवाण्या वाटणाऱ्या सूर्य, चंद्र, रात्र , दिवस, चांदण्या आणि उरल्या सुरल्या सगळ्यांना कस manage करता तुम्ही?......तुमच्या दोन ओळीत, चार शब्दात सारी रात्र उलगडते आणि भावतेही....जी इतक्या वर्ष जीव घेणी वाटत होती.......गेल्या काही दिवसांपासून नव्या उमेदीने उगवणाऱ्या सूर्याची नाही तेवढी तुमच्या पहाटेच्या, सूर्योदयाच्या कवितेची वाट पाहत दिवसाची सुरवात होते........आणि इतक्या वर्ष मनात निसर्गाचा असलेला जांगडगुत्ता हळू हळू सुटतोय की काय असंच वाटते........आभारी आहे ताई.....खूप कवी वाचले ताई निसर्गावर लिहिणारे.....पण सारे निसर्गात रमणारे वाटले.....पण तुम्ही तोच निसर्ग शब्दाने जगणाऱ्या वाटलात, म्हणून हा सारा शब्दांचा पसारा......बाकी काही नाही.....काही चुकलो असेल तर क्षमा असावी......पण ते सांगा ना?.....खरच सूर्य तुमच्या घरी सकाळी चहा प्यायला येतो का?.....आणि ती रात्र अंगाई ऐकायला?.....एवढंच जाणून घ्यायचं आहे ताई ....बाकी तुमच्या शब्दांचा वेडा आहे......त्या सूर्य, चंद्र, सकाळ, आणि जीवघेण्या रात्री सारखा. राहुल सिद्धार्थ साळवे.

Friday, June 27, 2014

मी अस्तिक आहे की नास्तिक,
हेच मला कळत नाही.
कोडे श्रद्धे अंधश्रद्धेचे,
मला सुटता सुटत नाही.

पाप पुण्य,
शाप आशीर्वाद,
देव दैवत,
मी मानत नाही.
पण दिसता दगड शेंदुरी,
हात जोडूनी..डोळे मिटुनी,
काही मागितल्या शिवाय राहत नाही.

धूप अंगारे,
ग्रह तारे,
रंगीबेरंगी गंडे दोरे.
माझ्यासाठी सगळेच खोटे.
तरी गळ्यात रुद्राक्ष,
कपाळावर हलकासा गंध,
मला खूप शोभून दिसे.

कुंडली...पंचांग...भविष्य.
या सार्याला मी थोतांड मानतो.
तरी एकट्यात मी, रोज नचुकता,
राशी चक्राचे पान वाचतो.

मग कधी मी फुलेंचा,
कधी गाडगे बाबांचा,
कधी प्रबोधनकारांचा,
तर कधी दाभोलकरांचा आदर्शही सांगतो.
अन जत्रेत रूढी परंपरेच्या नावाखाली,
चोरून मी बोकड ही कापतो.

कधी मुखी कबीरवाणी आणतो.
कधी संतांची संतवाणी सांगतो.
तरी धुण्या मी पाप माझे,
गंगेचे पाणी वापरतो.

या सार्यांची आज मनात,
खूप घुसमट होत आहे.
डोक्यात विचारांचं,
काहूर माजत आहे.

काय होणार...कस होणार.?
याचीच खूप धास्ती,
खर सांगू का मित्रा?
मलाही त्या शून्याची,
वाटते आता भीती.
   खर सांगू का मित्रा?
   मलाही त्या शून्याची,
   वाटते आता भीती.

राहुल सिद्धार्थ साळवे.

माय डाक्टर म्हणाला,
तुले दमा झालाय.
पण त्याले काय ठाऊक,
आयुष्यभर चुलीपुढ,
फ़ुकणीन मारलेला,
धूर तुह्या छातीत भरलाय.

तो म्हणाला,
थकलीस तू आता.
वय झालंय तुझं.
काय सांगू त्याले?
किती जणांच व्हत,
तुह्या डोहीवर बोझं.

काय मागशील तू ते,
खायला घाल म्हटला तुले,
मीठ भाकरीवर जिंदगी काढलीस,
त्याचीच तुले गोडी,
हे कस ग सांगू म्या त्याले?

इलाज नाय म्हटला,
आता या सार्यावर.
सगळा हाय आता,
तुह्या या नशीबावर.

कसा सांगू मी त्याले?
तुह्या फुटक्या नशिबाची कहाणी.
कित्येक काढलेल्या रात्री,
तांब्याभर पिऊन पाणी.

जाऊ दे...येडा हाय तो डाक्टर.
त्याले काय बी कळत नाय.
अशी कशी हारशील तू?
तू तर जिंदगीला जिकलेली,
वाघिणी सारखी माझी माय.
   तू तर जिंदगीला जिकलेली,
   वाघिणी सारखी माझी माय.

राहुल सिद्धार्थ साळवे.

Thursday, June 26, 2014

सांगेल का कोणी, अर्थ मला जगण्याचा.
थोडा तो हसण्याचा, थोडा तो रडण्याचा.

रमतात ना लोक? , त्या गोजिरवाण्या गोष्टीत?
त्या अंधारात रंगणाऱ्या, क्षणभंगुर स्वप्नांचा.

ठरते ना ज्यावरून? , जन्माचे सार्थक सारे.
तो खेळ आयुष्याचा , नेमका जिंकण्याचा.

चार खांद्यावर घेऊन , मिरवतात ना तो?
तोच सोहळा गर्दीतल्या, शांत आक्रोशाचा.

सांगेल का कोणी, अर्थ मला जगण्याचा.
थोडा तो हसण्याचा, थोडा तो रडण्याचा.

राहुल सिद्धार्थ साळवे


बघ एकदा मला, कुशीत सावरून.
बघ एकदा मला, तुही गोंजारून.

घे आनंद मिठीत, अंधारलेल्या रात्रीचा.
बघ एकदा मला, दिवा तो विजवून.

पाहतच आलीस तू , गर्दीत नेहमी मला.
बघ एकदा मला , एकट्यात डोकावून.

जरी शब्द वेडा मी , कवितेचा दिवाना.
बघ एकदा मला , कवितेत उतरून.

धडकी जरी तुला , लोकांच्या त्या प्रेमाची?
बघ एकदा मला , माझ्यातच पेटवून.

कशी कळेल नशा तुला , नजरेत काय असते.
बघ एकदा मला , पेल्यात मिसळून.

तरी न कळलो , जरी मी तुला?
बघ एकदा मला , तुझ्यात सामावून.

बघ एकदा मला, कुशीत सावरून.
बघ एकदा मला, तुही गोंजारून.

राहुल सिद्धार्थ साळवे.

मीच आज माझ्याशी, केला हा करार आहे.
मीच मला पुरेसा, बाकी बेकार आहे.

तुझ्या विरहाचा मला, खेद का तो व्हावा?
मीच माझ्या दुखांनी, पुरता बेजार आहे.

कुठे करत बसू , शोक स्वप्न जळल्याचा?
मीच माझ्या घरात तो , सजवलेला त्योहार आहे.

मी नाही जुमानत , त्या झालेल्या जखमांना.
मीच माझ्या हातांनी , केलेले ते वार आहे.

तरी करायचाच झाला , वार तुला माझ्यावर.
ठेव हात जखमांवर , तेच आता हत्यार आहे.

मीच आज माझ्याशी, केला हा करार आहे.
मीच मला पुरेसा, बाकी बेकार आहे.

राहुल सिद्धार्थ साळवे

Wednesday, June 25, 2014

दाटलेल्या माझ्या बंधिस्त भावना,
उगाचच तू उफाळू नकोस.

होशील जळून खाक तू,
जो शमलाय वणवा... त्यास पेटवू नकोस.

-राहुल 
गीत माझे आसुसले,
तुझ्यासाठी नाही ग.

मी कवी इतका मोठा नाही,
कि शब्दात तुला बांधेल ग.

-राहुल

मी प्रवासी

मी प्रवासी दुख सागरातला,
ना त्या सुखाच्या डबक्यातला.

मी निखारा पेटलेल्या वणव्यातला,
ना लावलेल्या खोट्या अगीतला.

-राहुल 
अस्वस्थता मनाची,
घडणाऱ्या...दिसणाऱ्या,
घटनांची...परिस्थितीची.

गर्दीचा वर्दळीचा,
गैरफायदा घेत,
स्त्री स्पर्श सुखाचा,
किळसवाणा आनंद घेणाऱ्या, 
सुशिक्षित समाजाची,
दशा पाहून होते,
अस्वस्थता माझ्या मनाची.

स्त्री स्वातंत्र....स्त्री समानता
सारे चव्हाट्यावर आणले जाते.
त्या गर्दीतल्या बाईला सारे कळते.
पण अब्रू...लाज...अस्मिता,
या शब्दात अडकून ती,
मुकुटपणे सहन करते.

तिची आवड....हौस मौज 
सारेकाही विचार करून.
कारण समाजाचा दृष्टीकोन,
त्याहूनही भयाण अशी मानसिकता,
ठळकपणे लक्षात घेऊन.

तरी कधीतरी ती आनंदापोटी,
या समाजाची,
बिनबुडाची चौकट तोडून,
हौस मौज करते.
आणि मग,
याच सुशिक्षित समाजाची,
नाहक बळी ठरते.

कारण,
इथे अत्याचार डोळ्याने होतात.
कटू किळसवाणे ऐकायला.
पण होतात.
काही करतात...काही टाळतात.
तर काही फक्त,
बघ्याची भूमिका घेतात.

ना गोंधळ...ना गुन्हा.
ना आक्रोश....ना पुरावा.
सारेकाही अगदी अलबेल.
गर्दीत डोकावून बघा एकदा,
सारेकाही उमजेल.

कधी आपणही या सार्यात,
तेही अगदी तोर्यात.
खोटी मुखवटे,
थोडी शुद्ध भाषा,
आणि टापटीप अश्या कपड्यात.

इतक्या खालच्या थराला गेलेल्या,
या समाजाची लाज वाटते.
आणि मी त्या समाजाचा घटक आहे,
याची किळस वाटते.

लाजीरवाण्याने,
जणू अभिमानाने, 
सांगतोय हे सारे,
कारण याचा अंत खूप भयाण आहे.
कारण ही,
भयाण अश्या वादळापूर्वीची,
भयाण अशी शांतता आहे.
कारण ही,
भयाण अश्या वादळापूर्वीची,
भयाण अशी शांतता आहे.

राहुल सिद्धार्थ साळवे 
( रंग गहिरे या काव्य संग्रहातून )

Tuesday, June 24, 2014

ऎ लेखणी पाया पडतो तुझ्या,
मला व्यक्त होऊ दे.
नको घालू मला,
कवितेच्या व्याखेची बिनबुडाची चौकट.
होऊ दे मला हलके.
मनातले विष ओकू दे मला कागदावर.
त्याच्या वासानतरी,
यांचे डोळे उघडतील.
अरे नको बांधु मला,
शब्दांच्या जाळ्यात.
मांडणीच्या शास्त्रात.
उपमा अलंकाराच्या खुराड्यात.
होऊ दे ग मला मुक्त.
माझा श्वास गुदमरतो,
या चंद्र चांदण्यांच्या मिठीत.
गुलाबाच्या काटेरी कुशीत.
या कल्पनांच्या...स्वप्नांच्या,
खोट्या जगात,
घूसमटतय ग मला.
एक दिवस यातच जीव जाईल माझा,
कुत्राचे जिणे जगल्यासारखे.
सोड माझा हात लेखणी,
पाया पडतो तुझ्या.
लिहू दे मला,
बालमजुराची मेलेली निरागसता.
अनाथाच्या डोळ्यातील विनवणी.
गरीबाच्या पोटाची भूक.
वेश्येची  किंकाळी.
लाचार माणुसकी.
लिहू दे ग मला.
लोक मला,
कवी नाही म्हटले तरी चालेल,
पण नपुसक म्हणता कामा नये.
मला लिहू दे ग ती,
समाजव्यवस्था.
व्यथा.
कथा.
वेदना.
नाहीतर मीही मरेल तसाच,
एक दिवस,
माणसातला कवी म्हणून.
मला मरायचे आहे,
कवितला माणूस म्हणून.
पण त्या आधी थोडे,
जगायचे आहे.
एक कवी म्हणून.
एक माणूस म्हणून.
जिवंतपणे,
जगायचे आहे.

राहुल सिद्धार्थ साळवे.


Friday, June 20, 2014

मला पाहिजे पुन्हा सारं,
हिशोब करायचा आहे मला.
मला पाहिजेत त्या,
तुझ्या विचारात मी जागवलेल्या रात्री.
पाहिलेली ती अधुरी स्वप्न.
तुझ्या काळजीत झालेली ती,
माझ्या श्वासांची घालमेल.
तुझ्या मिठीतले ते क्षण.
माझ्या गालावरचा तुझा तो स्पर्श.
तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन पाहिलेला तो,
मावळणारा सूर्य.
तुझ्या पायदळी तू तुडवलेली,
माझी सावली.
माझे शब्द,
माझ मन,
माझ प्रेम.
सार पाहिजे मला पुन्हा.
हिशोब लावायचा आहे मला.
आणि पहायचं आहे.
कुठे चुकलो मी ते.
कारण माझ मन मला खातंय.
त्याला उत्त्तर द्यायचं आहे.
ये मी वाट पाहतोय.
त्याच तुझ्या आवडत्या ठिकाणी.
जिथे तू माझा हात,
धरला होतास.
आणि,
सोडलाही.
मी वाट पाहतोय,
तुझ्या येण्याची.

राहुल सिद्धार्थ साळवे
( तुझ्या आठवणींच मोरपीस )

संदीप दादा यास,
का ते माहित नाही....पण लिहू वाटले....तुला, तुझ्यासाठी आणि तुला नतमस्तक होताना........तुझ्यावर लिहण्याइतका मी नक्कीच शहाणा नाही..........पण राहवलं नाही....म्हणून मोकळा होतोय....या शब्दांच्या ताऱ्यांतून.......सुरवातीला तुझ्या कविता वाचत असताना वाटले कवी आहेस........अमोल दादा शी मागच्या महिन्यात भेट झाली तेव्हा तो तुझ्या बदल बोलला.......आणि मग मी सुरु केला.......फेसबुकच्या विशाल आभाळात तुझा शोध घ्यायचा.....संदीप ( दादा)...या नावाची मी फोड केली......आणि आकाश गंगेतील स्वयं प्रकाशित ग्रहाचा आणि तुझ्या नावाचा संबंध माझा मीच, तुला समजून घेताना जोडला......आणि तो योग्यच आहे.....sun dip म्हणजे माझ्या बालिश भाषेत........सुर्य प्रकाश.....स्वयंप्रकाशित.....मार्ग दाखवणारा....जगवणारा, जागवणारा, एक उत्पत्तीचा उगम स्त्रोतच......खर तर माझी लायकी ही नाही दादा की तुझ्या बदल काही बोलाव.....पण ,एक प्रश्न मनाला खातोय. जेव्हा पासून सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रहण आणि बरेच काही शोध लावणारे जेव्हा वाचले, ऐकले.....तेव्हा नेहमी एक प्रश्न पडत आला.....ही माणस शेकडो दूर असलेल्या, डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टीच्या प्रेमात पडतात....आणि आपल्याला साधे वीत भर जवळच्या माणसांवरही प्रेम करता येत नाही..............बस याचंच उत्तर पाहिजे दादा.....बाकी,आयुष्य जगायला शिकायचं आहे तुझ्या आभाळागत छायेत.....ध्रुव तार्याच चमकण्याच गणित समजून घ्यायचं आहे तुझ्याकडून.....सप्तर्षीच असलेल एकत्रित कुटुंब नियोजन शिकायचं आहे.....सूर्याचा, चंद्राचा एकमेकान विषयी असलेल्या समजूतदार पण जाणून घ्यायचा आहे..............जास्त बोललो वाटते......बस इतकच दादा.........खूप कमी माणसं उरली आहेत या जगात जी माणूसपण जगात आहेत....बाकी सगळे जिवंत........असो....काही चुकलो असल्यास क्षमा कर......पण राहवले नाही म्हणून भडाभडा व्यक्त झालो......तुझ्या ग्रह, तार्यांना सांग ना लवकर मुहूर्त काढा म्हणून....हाहाहा ....कसला काय रे.....आपल्या भेटीचा.......माफ कर खूप अधिकाराने बोलतोय सार......पण वाटले ते बोललो......निस्वार्थी पणे, निर्मल निखळ भावनेने........sun च्या dip मध्ये असणार्या...........काळजी घे.दादा ...अजून काय बोलू.....बस...हलक झाल्यासारखे वाटले....एवढेच.......माझा बालिशपणा तू समजून घेशील हीच अपेक्षा.....बाकी तू तार्यांचे बेट एक दिवस दाखशील ही आशा....आणि अमोल दा तुझे आभार...तुझ्या मुळे तुझ्यासारखीच अजून एक व्यक्ती आयुष्यात लाभली...मनाने जिवंत असणारी..

Thursday, June 19, 2014

कर उध्वस्त...
विचारवंतांच्या...
वैचारिक...
भिंती...

जाळून...
टाक...
मोहल्ले...
जगण्याची...
व्याख्या...
शिकवनार्यांचे...

नागड..
पाड...
त्याचं...
पुस्तकातून...
चोरलेलं...
भिकार...
भंगार...
ज्ञान...

लाव सुरुंग...
त्यांच्या...
काल्पनिक...
रंगवलेल्या...
रंग महालाला...


काढ कोतळा...
घालून हात...
त्यांच्या...
तोंडातून...
खोटेपणात...
सजवलेल्या...
मनाचा...

तेव्हाच ...
दिसून येईल...
अस्तित्व तुझ...
नाहीतर...
मग काय?
कुत्री...
मांजरं...
मरतातच...
तसाच...
तुही मरणार...
एक...
दिवस...
न जगता...
आला...
म्हणून...
निसर्गाच्या...
नियमानुसार...
शेपूट...
घालून...



Tuesday, June 17, 2014

लैंगिक...
शिक्षणाचं...
माहेरघरच...
पाण्याच्या...
टाकीवर...
जपून...
ठेवलेलं....
शृंगारिक...
लेखणीत...
रचलेलं....
कोणाच तरी...
आत्मचरित्र....

अंगातून...
मुक्त...
केलेल्या...
दर्दी...
सल्फर डाय...
ओक्साईड च्या...
उग्र...
सुगंधात...
मिसळलेला....
असतो...
गांज्या...
देशीचा...
दरवळ...

सुर्य...
मावळला...
की...
रंगतो...
समलिंगांचा...
संभोगिक...
खेळ...

सोशल...
मिडीयाच्या...
वॉल वरही...
न भेटणारे...
श्वास...
सोडता...
सोडता...
भेटतात...
मीना...
हीना...
इत्यादींच्या...
नावा...
रुपान...
तेही...
एक...
रुपयात...

पुरुषत्व...
सिद्ध होणार्या...
त्याच...
चार भिंतीत...
सगळं...
अर्धा...
भोंगळे पणात...
निर्विकार...
पार...
पडत...
असतं...
तरी...
आपण...
येडे....
त्याला...
काय...
म्हणतो...?
तर...
मुतारी...

सगळं...
माहित...
असूनही...
सोफसटीकेटेड..
पणाचा...
आव...
आणत...
जगतो...
आम्ही...
मनसोक्त...
ती...
मुतारी...
खरच...
जगतो...
रे...


Thursday, June 12, 2014

जाऊ दे ना...
भाऊ...
स्वाभिमान...
अभिमान...
नको...
शिकवू...
आरसा...
रोजच...
पाहतो आम्ही...

आमचा...
मोडलेला...
कणा...
त्या प्रतीबिंबातच...
ठेऊन...
ताठ मानेन...
जगतो आम्ही...

झेंड्याच्या...
बाजारात...
नपुसकांच्या...
कळपात...
स्वतःलाच...
मर्द...
समजतो आम्ही...

अस्तित्व...
आमचे...
रस्त्यावर...
मांडून...
बाजारभावाने...
विकतो आम्ही...

मुडद्यांच्या...
सभेत...
तो...
आरसाच...
आम्हाला...
जिवंत वाटतो...
कपड्यांनी झाकलेल...
आमच...
नागडेपण...
कपड्यातच...
दाखवतो...

तू ही सोड...
तो झेंडा...
तो रंग...
ती लाचारी...
तो...
नसलेला बाप...
कुंकवाला...
आईच्या...
बदनाम नको करू...
कारण...
झेंडा...
जगवत नाही...
जगण्याला...
रंग नाही...
तुम्हीही जळणार...
आम्हीही जळणार...
उरलेल्या राखेला...
मात्र...
काहीच...
किंमत...
नसणार...

शेवट...
हाच...
आहे रे...
भावड्या...
हाती..
झेंडा...
घे...
शिक्षणाचा...
रंग...
असू दे...
माणुसकीचा...
आणि...
मग बघ...
प्रतिबिंब...
स्वाभिमान...
अभिमान...
तेव्हा...
विकत...
घ्यावा...
लागणार...
नाही...
जाऊ दे ना...
भाऊ...
स्वाभिमान...
अभिमान...
नको...
शिकवू...
आरसा...
रोजच...
पाहतो आम्ही...

नका...
नादी...
लागू...
आम्हाला...
उध्वस्त...
करायच्या...
आग...
घेऊन...
फिरतो...
आम्ही...
संपण्याची...
संपवण्याची...
आम्हाला...
नका...
दाखवू...
भीती...
कधीच...
संपलोय...
आता...
जिवंत...
आहेत...
ते...
आमच्यातले...
मुडदे...
पण...
परिवर्तनाच्या...
मशाली...
घेऊन...

दिसभर जळायची...
तव्हाच...
चूल पेटायची...
कधी कधी...
चुलीच्या जाळ्यात...
स्वतःच सरपण व्हायची...
मायच...
व्हती ती...

चुलीच्या राखेतून...
पुन्हा उभी राहायची...
कुशीत घ्यायची...
अन...
तिचा चटका...
आम्हाला नाय द्यायची...
मायच...
व्हती ती...

जळतानापण...
फक्त हसायची...
अस्थि...
वाहून जाव्यात...
तशीच...
वाहत जायची...
पुन्हा...
फिरून मात्र...
तिच्या...
पाखरांच्या...
आसऱ्याला यायची...
मायच...
व्हती ती...

पाठीच...
पोट करून...
चोचीन...
दाणा...
भरवायची...
भरल्या...
पोटाचं...
स्वप्न...
बघत...
रातभर...
जागायची...
मायच...
व्हती ती...

रोज स्त्री समानतेच्या...
बातम्या ऐकायची...
बापाच्या...
लाथाडण्यातच...
मात्र...
धन्यता...
मानायची...
अखेर...
करणार तरी काय...
मायच...
व्हती ती...

कवी : राहुल-सागर

Monday, June 9, 2014

जाता जाता मला, कळले होते सरणावर.
मोजतात लोक अश्रू, एक एक करून बोटावर.

वाकलेत जे, वाहुनी बोजे आयुष्याचे.
तेच वाहती तुमचे, मोठेपणासाठी खांद्यावर.

सरताना हळू हळू, वाट सुंदर जन्माची.
नेमकी मोडतात बोट, लोक ही वळणावर.

चारच पाऊले राहिली आता, अखेर निरोपाची.
मग बसेल मीही धूळ खात, कोपर्यात त्या भिंतीवर.

वाटते रे अजूनही, जगावे थोडे मनसोक्त.
पण लोकास या भरोसा पक्का,त्या लावणाऱ्या आगीवर.

जाता जाता मला, कळले होते सरणावर.
मोजतात लोक अश्रू, एक एक करून बोटावर.

- राहुल सिद्धार्थ साळवे.
मी कोसळतोय, कारण ढग दाटलेत.
तुझ्या ओल्या आठवणीत, श्वास ही भिजलेत.

सांग तूच, कसा जगू मी आता?
जे क्षण उसने, तुझ्यासाठी घेतलेत.

त्याच्या कुशीत जरी, निवांत तू निजलेली.
सोडव माझे श्वास, जे तुझ्यात गुंतलेत.

मी कोसळतोय, कारण ढग दाटलेत.
तुझ्या ओल्या आठवणीत, श्वास ही भिजलेत.

प्रेममित्र
 —
जे तुला न कळले, तेच तिला कळले.
उसवलेले धागे, हळुवार तिने बांधले.

उध्वस्त केले होते तू, मलाच माझ्यातुनी.
त्याच्याशीच नेमके, नाते तिने जोडले.

राख करून गेलीस ना, स्वप्नांना त्या माझ्या?
त्याच राखेत नव्याने, रंग तिने भरले.

दिल्या होत्यास ना काळजावर, जखमा त्या एकटेपणाच्या? 
त्यालाच नेमके, आपले तिने मानले.

शब्द ही मुके झाले होते गं, तू वार केले तेव्हा.
बोलके त्यास स्पर्शाने, त्यांना तिने केले.

जे तुला न कळले, तेच तिला कळले.
उसवलेले धागे, हळुवार तिने बांधले.

प्रेममित्र
 
साली जिंदगी मला, कळलीच नाही.
मी जगुनही आनंदात, ढळलीच नाही.

नाचत राहिलो मी, तालावर तिच्या.
पण ती बिलंदर, भाळलीच नाही.

प्रेममित्र
जा जाऊन सांगा तुमच्या कुबेराला,
आम्ही तुम्हाला विकत घ्यायच ठरवल आहे.
मोजून मापून,
स्वतःच्या पोटाला खाणारे तुम्ही,
आम्हाला भारी पडाल?
शिळ्या भाकरीचं,
झणझणीत कोड्यासाच,
रक्त वाहतंय अंगात.
लक्षात ठेवा.
तलवारी बिलवारीच्या गोष्टी,
आम्हाला नका सांगू.
अंधार पडला कि नाही लागत,
आमच्या घरात दिवा.
आम्ही प्रकाशाच विकत घेतला आहे.
तेजोमय..प्रकाशमान असा.
तर तुम्ही काय चीज आहात?
अमावसेच्या अंधारात आयुष्याच गणित सोडवणाऱ्या,
भेकड...साल्याहो.
जा जाऊन सांगा तुमच्या कुबेराला,
आम्ही तुम्हाला विकत घ्यायचं ठरवल आहे.

राहुल सिद्धार्थ साळवे

आता उरली कुठे

आता उरली कुठे ती, मजा जगण्याला?
आणि भाव ही नाही राहिला ,आनंदाने मरण्याला.

जिंकूनही नाही, लागत हाती काही.
रोज लागते येथे,फक्त बोली हरण्याला.

राख माझी हे ,कपाळालाच लावतील ना?
मग कसला आलाय अर्थ, उगाचच जळण्याला.

दुखानेच भरलाय, बाजार येथे माणसांचा.
कोण देईल त्यात किंमत, माझ्या या सलण्याला?

वापरला ज्यांनी, खांदा माझाच नेहमी.
कसा वापरू मी त्यांचा, अश्रू माझे ढाळण्याला.

खोटे ठरवतात बापुडे, माझ्या दिलखुलास हसण्याला.
आणि मिरवतात वाजतगाजत, तेच माझ्या रडण्याला.

म्हणूनच वाटते.

आता उरली कुठे ती, मजा जगण्याला?
आणि भाव ही नाही राहिला ,आनंदाने मरण्याला.

- राहुल सिद्धार्थ साळवे.
 

Friday, June 6, 2014

वणव्याची...
भीती...
मला...
नको...
दाखवू...
घर...
रोजच...
जळत...
माझ...
पुन्हा...
उभे...
राहण्यासाठी...

त्यातलेच...
निखारे...
गिळून...
रोज...
भरतोय...
पोट...
नव्याने...
पेटण्यासाठी...

जळून ...
छिलटे...
निघालेत...
आतड्यांच्या...
पिळाचे...
वास...
सुटलाय...
त्यांना...
जाणीवा...
भावना...
करपल्याचा.....
त्यातच...
रमतो...
जीव...
आता...

म्हणून...
सांगतोय...
वणव्याची...
भीती...
मला..
नको...
दाखवू...
घर...
रोजच...
जळत...
माझ...
पुन्हा...
उभे...
राहण्यासाठी...
धर्म आणि धम्म याला एक समजणारे बुळचट जेव्हा परिवर्तनाच्या गोष्टी करतात ना , तेव्हा कपड्यात झाकलेल त्याचं नागडेपण उठून दिसत....पायात करगोटा बांधून अक्कल शिकवणारे हे.....सुधारणेच्या गोष्टी करतात.....आणि माझ्यासारखे चाटे त्यांना मार्गदर्शक म्हणतात.....सर खूप छान...तर काय?....आपल्याच घरातली जळ मट चव्हाट्यावर आणायची आणि अभ्यासू पणाचा आव आणायचा........फाट्यावर मारतो आम्ही अश्यांना......परिवर्तन आणि बदल यातला फरक जर कळत नसेल न तर या आपण एकत्र गोट्या खेळू........आधीच लई भरकटला आहे समाज....त्यात तुम्ही अजून चोरलेली अक्कल पाजळू नका......१९ वर्षाच कवळ पोरग तुमच्या नादी लागून तलवारीला धार लावायच्या गोष्टी करतंय .......इथच धडकी भरती .....आणि तुम्हाला काय पाहिजे हार तुर , नारळ, सन्मान, पुरस्कार,टाळ्या एवढाच ना ?......सांगा ना आमच्या कानात, भरगच कार्यक्रम करू.......पण तुमच्या मोठे पणाच्या नादात उगाच समाजाला नका भरकटवु.....तुमच्या भंगार लेखणीने, आणि भिकार अश्या विचाराने.....नाहीतर तुमचा इतिहास काढावा लागेल....समाज प्रबोधन करायचं तर आधी स्वतःच प्रबोधन करा आणि मग समाजच करा........आणि नसेलच जमत तर आमच्या सारख गप बसा...पण उगाच बोट नका घालू.
चार भिंतीच जग वर फाटलेल्या आभाळासारख पोपडे निघालेलं छत... खिडकीला घातलेल्या परकरच्या, फाटक्या म्याक्सीतून, डोकावणारा सूर्य, पाहत असतो, माझ्या वेदनेचा, मीच चार पैसे घेऊन, मांडलेला बाजार... खाली पसरलेल्या फुलांच्या चादरीतही, मला बोचत असतात काटे... उशीच्या अंगातून पाजरणार माझाच घाम मला, गुदमरत असतो... १०० च्या बल्पला लावलेला पिवळा जिलेटीन, मला आयुष्याच्या होणार्या, सूर्यास्ता सारखा वाटतो... जिवंत मुडदा पडावा तशीच मीही, डोळे उघडे ठेऊन, पोपडे निघालेल्या आकाशाकडे पाहून, मोजत असते, माझ्या आयुष्याचे विस्कटलेले तारे... पण तो...तो धुंद असतो, माझ्या शरीराशी खेळत, त्याच्या नाका तोंडाच्या भोकातून, येणाऱ्या गरम वाफा जळत असतात, माझ्या अस्तित्वाला... ओरबाडत असतो तो मला, लचके तोडत असतो तो...माझ्यातल्या बाईपणाचे... रेडीओवर सुरु असलेल मंद अस गीत, माझ्या निरोपाचे होणारे, निरुपण वाटते... तेवढ्यात त्याची पकड सैल होते, मी झटकन मग त्याला दूर लोटते, कारण मुठीतल्या चुरगळलेल्या, नोटांचा हिशोब संपलेला असतो... आणि मग, राखेतून फिनिक्स जन्म घ्यावा तशी, मी उठून उभी राहते... नव्या सूर्यास्ताची, चार भिंतींच्या माझ्या जगात, १०० watt च्या सूर्याची, वाट बघत, पुन्हा उभी राहते... राहुल सिद्धार्थ साळवे ( तिच्या व्यथेची कथा)
Chat Conversation En