चार भिंतीच जग
वर फाटलेल्या आभाळासारख
पोपडे निघालेलं छत...
खिडकीला घातलेल्या परकरच्या,
फाटक्या म्याक्सीतून,
डोकावणारा सूर्य,
पाहत असतो,
माझ्या वेदनेचा,
मीच चार पैसे घेऊन,
मांडलेला बाजार...
खाली पसरलेल्या फुलांच्या चादरीतही,
मला बोचत असतात काटे...
उशीच्या अंगातून पाजरणार माझाच घाम मला,
गुदमरत असतो...
१०० च्या बल्पला लावलेला पिवळा जिलेटीन,
मला आयुष्याच्या होणार्या,
सूर्यास्ता सारखा वाटतो...
जिवंत मुडदा पडावा तशीच मीही,
डोळे उघडे ठेऊन,
पोपडे निघालेल्या आकाशाकडे पाहून,
मोजत असते,
माझ्या आयुष्याचे विस्कटलेले तारे...
पण तो...तो धुंद असतो,
माझ्या शरीराशी खेळत,
त्याच्या नाका तोंडाच्या भोकातून,
येणाऱ्या गरम वाफा जळत असतात,
माझ्या अस्तित्वाला...
ओरबाडत असतो तो मला,
लचके तोडत असतो तो...माझ्यातल्या बाईपणाचे...
रेडीओवर सुरु असलेल मंद अस गीत,
माझ्या निरोपाचे होणारे, निरुपण वाटते...
तेवढ्यात त्याची पकड सैल होते,
मी झटकन मग त्याला दूर लोटते,
कारण मुठीतल्या चुरगळलेल्या,
नोटांचा हिशोब संपलेला असतो...
आणि मग,
राखेतून फिनिक्स जन्म घ्यावा तशी,
मी उठून उभी राहते...
नव्या सूर्यास्ताची,
चार भिंतींच्या माझ्या जगात,
१०० watt च्या सूर्याची,
वाट बघत,
पुन्हा उभी राहते...
राहुल सिद्धार्थ साळवे
( तिच्या व्यथेची कथा)
Chat Conversation En
No comments:
Post a Comment