गावच्या येशीवर,
प्रेत व्हत सापडलं.
कोणी तरी म्हणे त्याले,
माणसान मारून टाकलं.
पण म्हाया डोक्यात,
येगळाच इचार चालू व्हता.
ज्याने मारले त्याले तो,
माणूसच नव्हता.
येशीवर मांगाच्या जन्याच,
प्रेत निपचित पडलं व्हत.
मांगवाड्यात जणू,
आभाळच फाटलं व्हत.
जन्या...ज्याने आवाज उठवला व्हता,
जातीभेदा इरोधात.
आन माणुसकी पेरू पाहात व्हता,
या जिवंत असणार्या मूडद्यात.
त्याच मूडद्यांनी,
जिवंत माणसाला मारला.
जो खर म्हणत व्हता,
त्या जन्यालाच खोटा ठरवला.
जातीवाद्यांनी मग जन्याच नाव,
पाटलाच्या पोरीशी जोडलं.
आन तिच्या पायी जन्यान,
इष प्याल्याच नगार वाजवलं.
जन्या मेला.
त्याचा आवाज थांबला.
बायको पोराचा त्याचा,
पार खेळ खंडोबा झाला.
आज तीस वर्षांनी मले,
जन्याची आठवण झाली.
कारण जन्याच स्मारक बांधणार हाय,
ही बातमी कानी पडली.
म्या हसलो.
जन्याला आठवू लागलो.
त्या व्हणार्या स्मारकात,
जन्याला शोधू लागलो.
पण जन्या नाय भेटला.
ना त्याचा आवाज कानी आला.
पण स्वार्थापायी बदललेला,
माणूस मातर दिसला.
पण स्वार्थापायी बदललेला,
माणूस मातर दिसला.
No comments:
Post a Comment